महाड : राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीत आपली नवी कारकीर्द सुरू करण्यापूर्वी युवराज छत्रपती संभाजी राजे रविवारी रात्री पाचाड आणि किल्ले रायगडावर जाऊन राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवराय आणि जगदीश्वरासमोर नतमस्तक झाले. ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो, त्यांचे आशीर्वाद घेवूनच संसदेतील नवीन कारकीर्द सुरू करायची याच भावनेतून आपण आज पाचाड आणि रायगड येथे आलो असल्याचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी जिजामाता समाधीस्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास छत्रपती युवराज संभाजीराजे यांचे पाचाड येथे आगमन झाले. तेथून छत्रपती संभाजी राजे थेट पाचाड येथील जिजामाता समाधीस्थळी रवाना झाले. येथे रघुवीर देशमुख, अनंत देशमुख यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्याचप्रमाणे पाचाड येथील महिलावर्गाने त्यांचे औक्षण केले. समाधीस्थळी राजमातेचे दर्शन घेवून त्यांना अभिवादन के ल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. दिल्ली दरबारी राज्यसभा सदस्य म्हणून कारकीर्द सुरू करण्यापूर्वी पाचाड आणि रायगड येथे येवून राजमाता आणि छ. शिवरायांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यासाठीच आपण येथे आल्याचे ते म्हणाले. राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडावर आले होते. त्यांनी रायगडच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांमध्ये या निधीचा विनियोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. किल्ले रायगडावर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांना या परिसरातील स्थानिक जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. यासाठी या परिसरातील गावांमध्ये आपण बैठका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत श्री शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंग सावंत, सुधीर देशमुख, अनंत देशमुख, प्रशांत दरेकर आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)सुविधा देणारछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडावर आले होते. त्यांनी रायगडच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तीन वर्षांमध्ये या निधीचा विनियोग करण्यात येणार आहे. रायगड संवर्धन आराखड्याच्या माध्यमातून केवळ रायगड किल्लाच नव्हे तर परिसरातील गावे आणि वाड्यांमध्येही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीराजे रायगडावर
By admin | Published: June 14, 2016 1:03 AM