मुंबई - शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021) साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, छत्रपती संभाजीराजेही उपस्थित असून शिवप्रेमींचा उत्साह शिगेला आहे. राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत असून शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती(Shivjayanti) कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra government) नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असं सरकारनं सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये थोडी नाराजी होती. त्यातच सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम 144 लागू केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात. राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी गर्दी करू नका असं आवाहन स्थानिक आमदार अतुल बेनके यांनी शिवप्रेमींना केलं आहे.