Ajit Pawar : आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का?, अजित पवारांचा भर सभेत सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:22 PM2022-02-19T12:22:33+5:302022-02-19T12:44:15+5:30
Ajit Pawar on Maratha Reservation : मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का? असा संतप्त सवाव अजित पवार यांनी भरसभेत केला.
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यभर उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवनेरी गडावर शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एकाने मराठा आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली. त्यावेळी मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का? असा संतप्त सवाव अजित पवार यांनी भरसभेत केला.
शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवनेरी गडावर शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्या भाषणादरम्यान प्रेक्षकांमधील एका व्यक्तीकडून मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी त्या व्यक्तीला खाली बसायला सांगितले. मात्र, काही वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यानंतर अजित पवार यांनी संताप व्यक्त करत तू कोणाची सुपारी घेऊन आला आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला.
"आज शिवजयंती आहे. असे चालणार नाही. मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का? पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना? मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही कायमच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र घटनात्मक तरतुदीमुळे आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेता येणार नाही, ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी पंतप्रधानांचीही भेट घेऊन कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत विनंती केली आहे", असे अजित पवार यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष होते. त्यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन केलं. महाराजांसारख्या युगापुरुषाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. ४०० वर्षानंतरही शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीच्या मनात आदर आणि अभिमान कायम आहे. महाराजांच्या नावाने प्रत्येक पिढीला शौर्याची आणि जनकल्याणाची प्रेरणा दिली आहे, असे अजित पवार म्हणाले.