मालवणजवळील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे राज्यासह देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथे शिवपुतळ्याला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी शिवराय आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे. शिवरायांपुढे नतमस्तक होऊन मी माफी मागतो. जे झालं ते अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
वाढवण येथील बंदराचं भूमिपूजन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मालवणमध्ये शिवपुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत माफी मागितली. नरेंद्र मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. माझ्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा महाराजा महापुरुष नाही आहेत. तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य देव आहेत. म्हणून मी आज माझे आराध्य देव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर मस्तक झुकवून माफी मागतो. ते पुढे म्हणाले की, आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही ते लोक नाही जे या भारतमातेचे या भूमीवरील वीर सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलत असतात. त्यांचा अपमान करतात. देशभक्तांच्या भावनेला चिरडतात. वीर सावरकरांबाबत अपशब्द उच्चारूनही जे माफी मागायला तयार होत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेने आता त्यांचे संस्कार जाणून घ्यावेत. मात्र मी आज या भूमीवर येताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर झुकून त्यांची माफी मागण्याचं काम पहिल्यांदा केलं आहे. तसेच जे जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना आपलं आराध्य मानतात. त्यांच्या मनाला या दुर्घटनेमुळे ज्या वेदना झाल्या आहेत. त्यांचीही मी मस्तक नमवून क्षमा मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य देवापेक्षा मोठं काहीच नाही आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.