सातारा : इंडोनेशियात ताब्यात घेण्यात आलेला कुख्यात डॉन छोटा राजनला त्याचं गाव मात्र ‘राजू निकाळजे’ याच नावानं ओळखतो. भारतातून परागंदा होईपर्यंत फलटण तालुक्यातील गिरवी या मूळ गावी छोटा राजनचं येणं-जाणं होतं. फलटण तालुक्यातील गिरवी गावात असताना राजन खरंच ‘छोटा’ होता. त्याचा जन्मच गिरवी या गावातील. त्याच्या वडिलांना मुंबईस्थित एका परदेशी कंपनीत नोकरी लागली, त्याच वेळी फलटण तालुक्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्याच वेळी राजनचे कुटुंब वडिलांबरोबर गिरवी या गावातून बाहेर पडले.अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश केल्यानंतरही अनेक वर्षे राजू निकाळजे हा आपल्या गिरवी या गावाला भेट देत होता. तसेच गावातील काही व्यक्तींना, संस्थांना मदतही करीत होता. गावातील धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात त्याचा सहभाग असायचा. त्याचा व्यवसाय काय आहे, यावरून विशेष चर्चा गावामध्ये फारशी होत नसे. परागंदा झाल्यानंतर मात्र राजन पुन्हा गिरवीकडे फिरकला नाही. (प्रतिनिधी)
छोटा राजन गिरवीत ‘राजू निकाळजे’च!
By admin | Published: October 26, 2015 11:07 PM