नवी दिल्ली: सुमारे २० वर्षांपूर्वी बंगळुरू येथून बनावट पासपोर्ट बनवून घेतल्याच्या आरोपावरून ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या खटल्यात येथील विशेष न्यायालयाने, ‘अंडरवर्ल्ड डॉन’ राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह चार आरोपींना प्रत्याकी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.विशष न्यायालयाचे न्यायाधीश वीरेंद्र कुमार गोयल यांनी कारावासाखेरीज या आरोपींना प्रत्येकी १५ हजार रुपये दंडही केला. या चौघांना सोमवारी दोषी ठरविण्यात आले होते. शिक्षेविषयी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने ही शिक्षा जाहीर केली.राजनखेरीज ज्या इतर तिघांना शिक्षा झाली, त्यात जयश्री दत्तात्रय रहाटे, दीपक नटवरलाल शहा व ललिता लक्ष्मणन यांचा समावेश आहे. हे तिघे संदर्भीत काळात बंगळुरू पासपोर्ट कार्यालयात नोकरीस होते. या तिघांच्या संगनमताने राजन याने बंगळुरू येथून सन १९९८-९९ मध्ये बनावट पासपोर्ट बनवून घेतल्याचा आरोप होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)आणखी ८५ खटले प्रलंबितराजन सध्या अन्य खटल्यात न्यायालयीन कोठडीत आहे. इतर तीन आरोपी जामिनावर होते. त्यांना आता अटक होऊन शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठविले जाईल. खंडणी वसुली, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार अशा गुन्ह्यांसाठी छोटा राजनवर महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली व उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये व सीबीआयकडे एकूण ८५ खटले प्रलंबित आहेत. सुमारे २७ वर्षे फरार राहिलेल्या राजनला आॅक्टोबर २०१५ मध्ये इंडोनेशियात अटक झाली व त्यानंतर त्याची भारतात पाठवणी करण्यात आली होती.
छोटा राजनला ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
By admin | Published: April 26, 2017 2:13 AM