राज्यसभा निवडणूक : काँग्रेसचे उमेदवार जाहीर
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
काँग्रेसने राज्यसभेसाठी महाराष्ट्रासह आठ राज्यांतील आपले उमेदवार शनिवारी जाहीर केले असून, ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने पहिल्या यादीत ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी दिली असून, त्यात कपिल सिब्बल, जयराम रमेश, आॅस्कर फर्नांडिस, अंबिका सोनी तसेच विवेक तनखा, प्रदीप टमटा आणि छाया वर्मा यांचा समावेश आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांचा मुकाबला काँग्रेस आता पी. चिदम्बरम यांच्याद्वारे करणार आहे. चिदम्बरम मोदी सरकारच्या आर्थिक धोरणातील त्रुटींवर हल्ला चढवत आहेत. कपिल सिब्बल यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर अंबिका सोनी या पंजाबमधून राज्यसभेवर जातील. आॅस्कर फर्नांडिस आणि जयराम रमेश या दोघांना कर्नाटकमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. भाजपातर्फे नुकतेच राज्यसभेवर गेलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांच्या बेताल वक्तव्यांना रोखण्यासाठी काँग्रेसने जयराम रमेश आणि कपिल सिब्बल यांचा उपयोग करून घेण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे. जयराम रमेश आणि कपिल सिब्बल हे अतिशय हुशार आणि प्रभावी वक्ते आहेत. आॅस्कर फर्नांडिस हे गांधी परिवाराच्या विश्वासातील नेते आहेत.पक्षाने पंजाबमधून उमेदवारी दिलेल्या अंबिका सोनी या काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्या असून, गेली अनेक वर्षे त्या सोनिया गांधी यांच्यासमवेत असतात. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचे निष्ठावंत प्रदीप टमटा यांना त्याच राज्यातून उमेदवारी मिळाली आहे. छत्तीसगडमधून छाया वर्मा यांना, तर मध्य प्रदेशातून विवेक तनखा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचा सर्वांनाच धक्कामहाराष्ट्रातून पी. चिदम्बरम यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तामिळनाडूला संसदेत प्रतिनिधित्व मिळावे, हा त्यांच्या उमेदवारीमागील हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तामिळनाडूमधून लोकसभा वा राज्यसभेवर काँग्रेसतर्फे प्रतिनिधित्व करणारे कोणीच नाही. ंअलीकडेच निवृत्त झालेले विजय दर्डा आणि अविनाश पांडे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवाय सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक यांच्या नावांची चर्चा होत होती; मात्र, काँग्रेसने या सर्वांनाच धक्का दिला.