- स्नेहा मोरे तनुश्री सांगते, चिंध्या बांधणे हा आनंददायक प्रकार असतो, पहिले वर्ष प्रयोग करण्यात आणि चुका करून दुरुस्त करण्यात गेले. आता मात्र आम्ही कल्पकता वापरून छान छान प्रयोग करत असतो. लोकही त्यांचे शिल्लक कापड, चिंध्या आम्हाला आणून देतात. बऱ्याच महिलांना यामुळे शिवणकलेची आवड लागली आणि त्यांच्यासाठी ही जाणीव खूपकाही देणारी आहे. शिंप्याच्या दुकानातील उरलेली ‘चिंधी’ हा तसा दुर्लक्षित घटक. मात्र याच ‘चिंधी’तून नवउद्योग साकारून त्याची यशस्वी कारकिर्द एका तरुणीने प्रत्यक्षात उतरविली आहे. केवळ वेळ घालविण्याच्या उद्देशातून केलेल्या कामातून मुंबई मानखुर्दच्या तनुश्री शुक्ला हिने एका वेगळ्या विश्वाला साद घातली आहे. तनुश्रीच्या कुटुंबाच्या कपडे शिवण्याच्या व्यवसायातील वाया जाणाऱ्या चिंध्यांपासून या वस्तू बनविण्यास सुरुवात झाली. तेथे टनावारी कपड्यांच्या चिंध्या रोज तयार होत असत आणि बहुतेकवेळा हा वाया जाणारा कपडा कचऱ्यात जात असे. तनुश्री यांनी अशा चिंध्यांपासून नानाविध वस्तू तयार करून ‘चिंदी’ ही एक वेगळी चळवळ निर्माण केली आहे.महिलांच्या छोट्या गटाने किती मोठे काम करून दाखवले आहे. त्यांच्या संकल्पना आणि सामूहिक निर्मितीच्या प्रयत्नांतून ‘चिंदी’ने आकार घेतला आहे. याविषयी तनुश्रीने सांगितले की, कारखान्यात शिलाई यंत्रावर काम करणारी एक महिला हस्तकला करत होती. ती मानखुर्द येथील झोपडपट्टीत राहत होती. एक दिवस तिने मला कपड्यासोबत कापाकापी आणि जोडाजोडी करताना पाहिले आणि तिने सांगितले की तिलाही हे काम येते तसेच तिच्या शेजारी असलेल्या अनेक जणी ते करू शकतात. त्यांनी मला दाखविले की त्या चिंधी कपड्यापासून कशा प्रकारच्या वस्तू तयार करू शकतात. त्यात स्वेटर, टोप्या, गोधड्या अशा वस्तू होत्या. या महिला उत्तर भारतातून आलेल्या होत्या आणि त्यांना शिवणकाम, हस्तकाम माहिती होते. मात्र त्यांना या शहरात त्यांच्या कलेला कोणताही वाव नसल्याचे दिसत होते, त्यामुळे त्यांचे कौशल्य वाया जात होते. त्यामुळे नाइलाज म्हणून अनेक जणी त्यांच्या जुन्या कपड्याच्या गोधड्या करून घरातच वापरत होत्या. त्यातून काही जणींना निवडले आणि वाया जाणाऱ्या चिंधी कपड्यांपासून हस्तकलानिर्मित वस्तू तयार करण्याचा उद्योग सुरू केला.या हस्तकलाकार महिला मानखुर्दच्या झोपडपट्टी परिसरात राहतात. कामासाठी चार महिलांची मुख्य चमू तयार असते. याच परिसरात मध्यवर्ती जागा आहे, त्यांच्यापैकी बहुतेक जणींना घरातून बाहेरकामासाठी जाण्याची अनुमती नसते. जरी त्या चिंधीचे काम करीत असतील तरी त्या घरातून फावल्या वेळात काम करतात. जवळच्या केंद्रात त्यांना संकल्पना, कल्पना यांची आदान-प्रदान करता येते. त्यातून नवीन वस्तू आणि नक्षीकाम केले जाते. महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाविषयी तनुश्रीने सांगितले की, डिझाइन आणि प्रशिक्षणाचे धोरण त्यांचे कौशल्य पाहून पहिल्यांदा ठरविले जाते. कामाची पद्धत आणि उत्पादन पाहून त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यात त्यांना बदल सांगतो. त्यात गोधड्या आहेत ज्या महिलाच तयार करतात. कारण पहिल्यापासून महिला त्यांच्या जुन्या कपड्यापासून त्या तयार करीत होत्या मात्र त्यात विविधता आणि नक्षीकामाची भर घातली. साऱ्या वस्तू त्यांच्याच संकल्पनेतून तयार होत असतात. या महिलांसोबत वर्ष-दीड वर्षापासून काम करीत आहोत. यासाठी सुरुवातीला साऱ्या व्यवस्था केल्या, नमुने तयार केले, शिलाई काम केले अगदी निराशाही पदरी आल्याचे तनुश्रीने सांगितले, पण हा खूप वेगळा अनुभव होता. आमच्या सोबत काम करणाऱ्या बऱ्याच महिलांना यामुळे शिवणकलेची आवड लागली आणि त्यांच्यासाठी ही जाणीव खूपकाही देणारी आहे. त्या कायम अर्धवेळ कामगार म्हणून काम करू शकतात. कारण त्यांना त्यांचे कुटुंब आणि घरच्या जबाबदाऱ्या यांना महत्त्वाचे स्थान द्यायचे असते, चिंध्या बांधणे हा आनंददायक प्रकार असतो, पहिले वर्ष प्रयोग करण्यात आणि चुका करून दुरुस्त करण्यात गेले. भविष्यातील ‘चिंदी’च्या वाटचालीविषयी तनुश्रीला विचारले असता तिने सांगितले की, भविष्यात घर सजावट, ब्रँण्डस, घरातील नक्षीकाम सर्वकाही टाकाऊतून टिकाऊचे असेल, लोकांना त्यांच्या जवळच्या टाकाऊ वस्तू पुन्हा वापरता येतील अशा कराव्या लागतील त्या वेळी आमच्यासारख्या संस्थांची गरज नक्की भासेल हा विश्वास आहे.
- - moresneha305@gmail.com