जयंत धुळप -
अलिबाग, दि. 23 - रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्राचे लाडके गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी शिक्षकाची भुमिका घेत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना अचंबित केलं. रेवदंडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना ‘शिवाजी महाराज’ हा धडा तर सहावीच्या विद्यार्थ्यांना ‘हडप्पा तेहजीब’ हा धडा त्यांनी शिकवला. विशेष म्हणजे अस्खलीत उर्दू भाषेत त्यांनी शिकवणी दिल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालक आश्चर्यचकित झाले.
‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ बनले थेट ‘शिक्षक’
जि.प.च्या या उर्दू शाळेत एकूण केवळ 12 विद्यार्थी आहेत. रेवदंडा बायपास मार्गावर थोडय़ाशा आडबाजूला आणि अत्यंत दूर्लक्षीत असलेल्या या शाळेत स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे आले आहेत, यावर प्रथम कोणाचा विश्वासच बसला नाही. मुख्याध्यापक बी.एस.मुकादम यांनी पांढरपट्टे यांचे स्वागत केले. आदरातिथ्याच्या सरकारी पद्धती थोडय़ाशा बाजूला ठेवून पांढरपट्टे ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ या आपल्या रोल मधून बाहेर येवून थेट विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांचे ‘शिक्षक’ बनून गेले, हे सारे अनूभवताना उपस्थित सारे सुखावून गेले होते.
विद्यार्थ्यांसोबतच स्नेहभोजन
शाळेची उर्दू मधील प्रार्थना आणि भारताची प्रतिज्ञा झाल्यावर पांढरपट्टे यांनी या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांना पूर्णपणो उर्दूतच शिकवले. शाळेच्या पोषण आहाराची पाहणी करुन विद्यार्थ्यांकरीता करण्याच आलेले जेवण त्यांनी विद्यार्थ्यां सोबतच घेवून स्नेहभोजनाचा आगळा आनंद देखील त्यांना दिला.
शाळा अहवाल लेखन उर्दूत आणि स्वाक्षरीदेखील उर्दूत
शाळेच्या अहवाल पुस्तिकेत आपल्या या शाळाभेटीचा अहवाल पांढरपट्टे यांनी चक्क उर्दू मध्येच लिहून त्याखाली आपली स्वाक्षरी देखील उर्दूतच केली. शाळेसाठी ही अहवाल पूस्तिका एक ऐतिहासिक दस्तच झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित शाळा समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.
उर्दू मध्ये शिकवण्याचा आनंद मिळाला
उर्दू भाषेचा मी जाणीवपूर्वक अभ्यास केला आहे. उर्दू गझल हा माझा आवडीचा विषय आहे. परिणामी आपण उर्दू शाळेतील विद्याथ्र्याना शिकवावे अशी एक इच्छा होती. ती या निमित्ताने पूर्ण झाली. मुलांमध्ये गेल्यावर खूप आनंद वाटला. त्यांच्या आनंदाला मी निमीत्त ठरु शकलो याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
सहावीतील विद्यार्थ्याना ‘हडाप्पा तेहजीब’ अर्था हडाप्पा संस्कृती उर्दूत शिकवताना पांढरपट्टे
हवाल पुस्तिकेतील उर्दूतील अहवाल लेखन
पांढरपट्टे यांची अहवालाअंती उर्दूत स्वाक्षरी
रेवदंडा उर्दू शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यां समवेत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्राचे लाडके गझलकार दिलीप पांढरपट्टे