ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 30 : जिल्ह्यात पाटबंधारे, वीज कंपनी, महसूल आदी प्रमुख विभागांमधील अधिकारी आपल्या कार्यालयात थांबत नाहीत. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. पालकमंत्री नियुक्त केले, पण तेदेखील येत नाहीत. यामुळे जनतेमध्ये असंतोष वाढत असून, यापुढे या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आपले आंदोलन अधिक तीव्र करील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास भाऊलाल पाटील यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिला. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले, संदीप पवार, अॅड.एस.एस.पाटील, वाय.एस.महाजन आदी उपस्थित होते.
गुन्हे दाखल करण्याची तत्परता दाखविता...राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांवर जिल्हा प्रशासनाच्या पत्रानुसार गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल करण्याची जशी तत्परता दाखविली जाते. तशी तत्परता प्रशासनाने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दाखवावी. कांदा प्रश्नी कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत होते. पण अधिकारीच जिल्हाधिकारी कार्यालयात थांबत नाहीत. कार्यकर्त्यांनी तोडफोड केली नाही, अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले नाही. तरीदेखील गुन्हे दाखल झाले. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याबाबत आक्षेप नाही. परंतु आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर गुन्हे दाखल झाले. जिल्हाधिकारी स्वत: महिला आहे. त्यांनी महिला म्हणून संबंधित विद्यार्थिनींचे नुकसान होणार नाही याचा विचार करायला हवा होता, असा मुद्दाही पाटील यांनी मांडला.