मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. जे. वाघेला बुधवारी सेवानिवृत्त झाल्यावर गुरुवारी तातडीने या पदावर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांची नियुक्ती करण्यात आली. न्या. चेल्लुर २४ आॅगस्टपासून पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. मुंबई हायकोर्टाच्या १५० वर्षांच्या इतिहासातील त्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असणार आहेत.विधी व न्याय मंत्रालयाने १० आॅगस्ट रोजी अधिसूचना काढून कोलकता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांची बदली मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आल्याचे जाहीर केले.न्या. चेल्लुर या मुंबई उच्च न्यायालयाच्या ४१ व्या मुख्य न्यायाधीश असतील. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश असतील. त्यांच्यापूर्वी १९९४ मध्ये निवृत्त न्या. सुजाता मनोहर यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविले होते. तब्बल २२ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाला दुसऱ्या महिला मुख्य न्यायाधीश होण्याचा मान चेल्लुर यांना मिळाला आहे. २२ आॅगस्ट रोजी त्यांच्या शपविधी व्हावा, यासाठी उच्च न्यायालयाकडून राज्यपालांना पत्र लिहिण्यात आले आहे. न्या. चेल्लुर यांचा जन्म १९५५ मध्ये कर्नाटकमधील बेल्लरी गावात झाला. त्यांनी १९७७ मध्ये कायद्यात पदवी घेतली. १९८८ मध्ये त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी १० वर्षे वकिली केली. २००० मध्ये त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले. तेथून २०१४ मध्ये त्यांची बदली कोलकाता उच्च न्यायालयात करण्यात आली. बेल्लरीमधील त्या पहिल्या महिला वकील आणि परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या. (प्रतिनिधी)
मुख्य न्यायाधीशपदी मंजुळा चेल्लूर यांची नियुक्ती
By admin | Published: August 12, 2016 4:10 AM