मुंबई : राज्यात भाजपा लोकसभेच्या 43 जागा जिंकणार आणि ती वाढलेली 43 वी जागा बारामतीची असेल, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिलेले होते. यावरून राजकीय प्रतिआव्हाने दिली गेली, बारामतीतून कोण उभे राहणार मोदी, शहा की फडणवीस असेही खिजवले गेले. मात्र, येत्या 15 फेब्रुवारीला याच बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार असल्याने यावेळी दोघांची प्रतिक्रिया काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सामाजिक न्याय विभागाने 15 फेब्रुवारीला एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेऴी मुख्यमंत्री आणि शरद पवार दोघेही एकाच मंचावर येणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी नुकतेच शरद पवारांना माढा मतदारसंघातून हरविणार असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच बारामती पवारांसाठी सेफ सीट असून तेथून त्यांनी निवडणूक लढविल्यास हरणार नाहीत, असा सल्लाही दिला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी राज्यात भाजप लोकसभेच्या 48 पैकी 43 जागा जिंकणार आणि 43 वी जागा बारामतीची असणार असे वक्तव्य केले होते.
यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. सोशल मीडियावरही टीका केली जात होती. बारामतीमध्ये कोण उभे राहणार? मोदी, शहा की फडणवीस असा खोचक प्रश्नही विचारला गेला होता. भाजपाने राज्यात सरकार स्थापन करताना राष्ट्रवादीची मदत घेतली होती. आता भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनी थेट राष्ट्रवादीच्याच अध्यक्षांना आव्हान दिल्याने 15 फेब्रुवारीला पवार काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.