ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या मुंबई पोलिसांच्या घरांसाठी प्रयत्न करणार असून पोलिसांना स्वतःच्या मालकीची घरं कशी देता येतील, यासाठी योजना तयार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पोलीस वसाहती दुरुस्ती करणार असून अनेक नव्याने घरं बांधण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. घाटकोपरमध्ये पोलिसांसाठी स्मार्ट टाऊनशिप तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबईत पोलिसांसाठी 25 ते 30 हजार घरं बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सोबतच घाटकोपरला तयार करण्यात येणा-या टाऊनशिपध्ये आरोग्य, शिक्षणासंबंधी सर्व सुविधा असतील. पोलिसांसाठी देशात पहिलीच अशा प्रकारची टाऊनशिप असेल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
मुंबईत 2 ऑक्टोबरपासून सीसीटीव्ही नेटवर्क सुरु करणार आहोत. शिवाय, निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळण्याची योजना सुरु करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.