मुंबई : नागपूर महानगर क्षेत्रासाठीच्या नियोजनबद्ध विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास योजनेस मंजुरी दिली आहे. या विकास योजनेतून नागरी क्षेत्रे आणि प्रस्तावित समृद्धी महामार्गासाठीचे क्षेत्र वगळण्यात आले आहे.महादुला, मौदा, कन्हान-पिपरी, हिंगणा या नगर पंचायती आणि कन्हान-पिपरी, वाडी, वानाडोंगरी आणि पारशिवनी नगर परिषदांचे क्षेत्र वगळण्यात आले आहे. नागपूर-मुंबई समृद्ध महामार्गाच्या अनुषंगाने हिंगणा तालुक्यातील वडगाव बक्षी, हळदगाव, भानसुली व सावंगी हे क्षेत्र वगळण्यात आले आहे.या विकास योजनेमध्ये शेती विभागासाठी ए १, ए २ असे दोन वेगवेगळे झोन ठेवण्याऐवजी दोन्ही झोनसाठी एकच शेती व नाविकास विभाग असे झोन प्रस्तावित करण्यात आले आहेत.या महानगर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासने शासनाला सादर केलेल्या विकास योजनेमध्ये आर १ ते आर ४ असे चार रहिवासी झोन सूचित करताना त्यांच्यासाठी वेगवेगळा चटई निर्देशांक (एफएसआय) प्रस्तावित केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेल्या विकास योजनेत एकच रहिवासी वापर झोन असेल आणि त्यासाठी एक एफएसआय देण्यात आला आहे.सुधार प्रन्यासने २४ आॅगस्ट २०१६ रोजी विकास योजना राज्य शासनाला सादर केली होती. नगरविकास विभागाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि मुख्यमंत्र्यांनी एकूण सव्वावर्षाच्या आत विकास योजनेस अंतिम मंजुरी दिली.
नागपूर महानगर क्षेत्र विकास योजनेस मुख्यमंत्र्यांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:39 AM