संग्रामपूर (जि. बुलडाणा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा जिल्हा दौर्यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयाला २१ मे रोजी भेट देऊन विविध योजनाच्या माध्यमातून मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता निकषांमुळे होत नसल्याचे समोर आले आहे.संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीय नलिनी आनंदा दुधमल रा.लाडणापूर यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वनपर भेट दिली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी सदर कुटुंबीयाला शासकीय योजनेमधून सौर कृषी पंप, ठिबक संच तसेच पिक कर्ज योजनेचा लाभ देण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही मदत मिळत नसल्याने या शेतकरी कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी सहकुटुंब १0 ऑगस्टपासून उपोषण सुरु केले आहे. तेव्हा खळबळून जागे झालेल्या प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटूंबास दिलेल्या पत्रातुन आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निकषाची अडचण असल्याचे स्पष्ट केले आहे. सौर कृषी पंप देण्यासंदर्भात पात्रतेचे काही निकषामध्ये लाभार्थ्यांची जमीन ५ एकारापेक्षा कमी असावी, लाभार्थी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील असावा, धडक सिंचन योजनेचा लाभार्थी असावा, लाभार्थी महावितरण कंपनीचा सद्यास्थितीत ग्राहक नसावा असे आहेत. परंतु सदर कुटुंबाकडे मौजे लाडणापूर येथील गट नं.३0१ मध्ये पुर्वीपासून कृषीपंपाची वीज जोडणी असून महावितरणचा ग्राहक आहे. त्यामुळे त्यांना सौर कृषीपंपाचा लाभ अस्तित्वात असणार्या नियमानुसार दिल्या जावू शकत नाही.या आत्महत्याग्रस्त कुटुंबास पीककर्ज देण्यासंदर्भात एसबीआय सोनाळा यांचा अहवाल मागविण्यात आला असता कै.आनंदा सोनाजी दुधमल यांनी १३ सप्टेंबर १२ रोजी रूपये १ लाख रूपये पिककर्ज व २ मार्च १0 रोजी रूपये ६0 हजार रू. मुदती कर्ज घेतलेले असून सदर कर्ज थकीत आहे. वरील दोन्ही कर्ज थकीत असल्यामुळे नवीन पीककर्ज देण्यास बँकेने सुध्दा असर्मथता दर्शविली आहे. या प्रकारावरून प्रशानाची हतबलताच समोर आली आहे.
निकषात बसत नसताना मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
By admin | Published: August 14, 2015 12:13 AM