ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ७ - पर्युषण पर्वात उपवास आणि अहिंसेचे महत्व मोठे असून ज्यांनी उपवास केले अशा तपस्वींच्या दर्शनाचा लाभ आणि आशीर्वाद मला मिळाला हे माझे भाग्य आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज सकाळी ठाणे येथील सिंघानिया स्कूल येथे मुख्यमंत्र्यांनी जैन पर्युषण सिध्दीतप पारणानिमित्त आयोजित कार्यक्रमात येऊन उपवास ठेवलेल्या जैन बांधवांची भेट घेतली तसेच राजस्थानमधून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांचे आशीर्वादही घेतले.
जैन धर्माने जगाला महान मुल्यांची शिकवण दिली
मुख्यमंत्री यावेळी उपवास ठेवलेल्या जैन बंधू आणि भगिनींना उद्देशून म्हणाले कि, जैन धर्मात ‘मिछामि-दुकडम’ असं म्हणून क्षमा मागितली जाते. या पवित्र अशा पर्वात क्षमेला महत्व असून कळत-नकळत माझ्याकडून कुणाचेही मन दुखावले गेले असेल तर मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो. आज या ऐतिहासिक अशा उपवास समाप्तीच्या निमित्ताने मला एका चांगल्या कार्यसाठी यायला मिळाले याचा मला आनंद आहे. मनुष्य आपल्या कर्मांसाठी स्वत: जिम्मेदार असतो आणि अशावेळी झालेल्या चुकींसाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे. आमच्या गुरुंनी कठीण तप करून सिद्धी प्राप्त केली आहे, आणि महान अशा मानवी मुल्यांचा अंगीकार केला आहे, त्याची शिकवण समस्त मानवजातीला दिली आहे. आज याप्रसंगी महान अशा गुरुदेवांचे आशीर्वाद घेण्याचा लाभ मला मिलालात्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमचे काम आणखी चांगल्या पद्धतीने करूत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची प्रशंसा
आपल्या आशीर्वादपर भाषणात श्री यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले कि, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजींची भूमी असून मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत. त्यांनी सर्व प्रजा अहिंसक आणि निर्व्यसनी होण्यासाठी प्रयत्न करावेत. आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यातही जैन समाजातील तरुण आपले संस्कार विसरलेले नाहीत ही अतिशय चांगली आणि उत्साहवर्धक बाब आहे. याच पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीने संस्कारी बनावे. यावेळी महाराजांनी मुख्यमंत्र्यांना एक पुस्तकही भेट म्हणून दिले. यावेळी आयोजक श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल एंड ज्ञाती ट्रस्ट, कोकण क्षेत्र यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांचा मंगल तिलक लावून सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती.
आजच्या कार्यक्रमात २३० जणांनी ४४ दिवस सिद्धी तप उपवास केला होता तसेच ३० जणांनी केवळ पाणी पिऊन उपवास केला होता. श्री पद्मयश सुरीश्वरजी महाराज, श्री वीरयश सुरीश्वरजी महाराज यांनीही यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना आशीर्वाद दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उत्तम सोलंखी, ललित पारेख, भवरलाल सोलंखी, विश्वस्त नारमल जैन, नगराज जैन, सचिव सुरेश बच्छावत, उदय परमार, सुरेश छाजेड, नरेंद्र जैन, वसंत जैन, रमेश पुनमिया, यांनी परिश्रम घेतले.