आंबेठाण : ‘आम्ही सत्तेतून बाहेर पडू म्हणणारे सेनेचे मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरत आहेत. राजीनामा खिशात ठेवायचा असतो का, असा सवाल करीत उद्धव ठाकरे नुसतेच बोलतात. पण, तेच मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीत गुरफटून पडले आहेत. मुख्यमंत्री यांना गुंड म्हणतात, मग कशाला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता,’ अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वासुलीफाटा येथे केली.खेड तालुक्यातील वाशेरे-नायफड, वाडा-कडूस, पिंपरी बुद्रुक-पाईट, नानेकरवाडी-महाळुंगे या गटातील व गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ वासुलीफाटा (ता. खेड) येथे आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते. या वेळी माजीआमदार दिलीप मोहिते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, युवकचे प्रदेश सरचिटणीस शैलेश मोहिते, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे सभापती नवनाथ होले, पंचायत समितीचे सभापती सुरेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, मंगल चांभारे आदी मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले की, खासदारांनी विमानतळाला सतत विरोध केला म्हणून खेड तालुक्यात होणारे विमानतळ पुरंदर तालुक्यात गेले, अशी टीका खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर केली, तर आमदार होण्यापूर्वी आम्ही जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष केले, आता दुसरीकडे जाऊन आमदार झाल्यावर दोन वर्षांत किती कामे केली? या वेळी दिलीप मोहिते, रमेश राळे, माणिक कदम, अमोल पानमंद, अरुण मुळूक, बाळासाहेब लिंभोरे, सुरेश शिंदे, अरुण चांभारे, रामदास मेंगळे, कैलास लिंभोरे यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले, तर आभार सचिन देवकर यांनी मानले.(वार्ताहर)
मुख्यमंत्र्यांना गुंड म्हणता, मग सत्तेत का ?
By admin | Published: February 15, 2017 1:49 AM