अकोला : राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि अकोल्याचे भाजपा खासदार संजय धोत्रे यांच्यातील धुसफूस गुरुवारी जाहीरपणे चव्हाट्यावर आली. डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा 15 दिवसांनंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशारा भाजपाचे खासदार संजय धोत्रे यांनी गुरुवारी दिला. दोघांमधील संघर्ष टोकाला गेल्याच्या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेतली असून, ते शनिवारी बुलडाणा दौऱ्यावर जाण्यापूर्वी सकाळी अकोला विमानतळावर या दोघा नेत्यांमध्ये समेट घडवून आणू शकतात, असे सूत्रांकडून कळले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी सकाळी बुलढाणा दौऱ्यावर जात आहेत. पूर्वी औरंगाबाद येथून बुलढाणा असा त्यांचा दौरा निश्चित होता. परंतू, गुरुवारी खासदार संजय धोत्रे यांनी निर्वानीची भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांना आपल्या कार्यक्रमात थोडा बदल करून अकोला येथे येण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी सकाळी १०:२५ वाजता अकोला विमानतळावर ते डॉ. रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे या दोघांची भेट घेऊन त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतील, असे भाजपा मधील अंतस्थ सूत्रांची माहिती आहे.डॉ. रणजित पाटील यांचे मूळ गाव असलेल्या घुंगशी येथील ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान उफाळलेल्या वादातून, डॉ. पाटील यांच्या निकटवतीर्यांनी विरोधी गटातील लोकांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केल्याचा व एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हे का दाखल केले नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात, भाजपाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, खा. धोत्रे यांनी डॉ. रणजित पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.खा. धोत्रे व डॉ. पाटील यांच्यातील बेबनाव नवा नाही. दोन्ही गट सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. डॉ पाटील यांच्या घुंगशी या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीवरून या दोन गटांमधील वाद नव्याने उफाळला आहे. निवडणुकीदरम्यान डॉ. पाटील यांच्या गटातील लोकांनी विरोधी गटातील हिंमतराव देशमुख यांच्यावर हल्ला करून, त्यांचे बोटच दातांनी तोडून टाकण्याचा प्रकार घडला आहे. याशिवाय इतरही काही जणांना मारहाण व एका महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती; मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत.या पार्श्वभूमीवर खा. धोत्रे यांनी गृह राज्यमंत्र्याना लक्ष्य करून, त्यांच्यावर अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. शासकीय यंत्रणेला वेठीस धरून मनमानी करणा-या डॉ.पाटील यांची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा पंधरा दिवसानंतर आपण व आपले सहकारी भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशाराच त्यांनी दिला होता.