बीड : बीड जिल्हा पोलीस दलातील एका 27 वर्षीय महिला पोलीस कर्मचा-याने लिंग बदल करुन पुन्हा सेवेत रुजू करण्याची मागणी केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. पोलीस महासंचालकांनी लिंगबदलाची परवानगी नाकारल्यानंतर संबंधित महिलेने उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. दरम्यान, या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक आणि गृह विभागाला दिल्या आहेत. दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याने नियमात तरतूद करुन सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या पोलीस दलातील महिलेने बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे एका अर्जाद्वारे लिंग बदलण्यासाठी परवानगी मागितली होती. असे प्रकरण पहिल्यांदाच असल्याने श्रीधर यांनी हा अर्ज पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला. त्यांच्याकडूनही याबाबत निर्णय न झाल्याने प्रकरण पोलीस महासंचालकांकडे गेले. दोन दिवस विचारविनिमय झाला. शनिवारी रात्री परवानगी नाकारल्याचे पत्र बीड पोलीस अधीक्षकांना महासंचालक यांच्याकडून मिळाले. त्यानंतर आज या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुरुष होण्याचे स्वप्न अर्धवट-मागील अनेक वर्षांपासून ही महिला पोलीस पुरुषांसारखी राहत होती. तिचे हावभाव, भावनाही पुरुषांसारखे आहेत. तसेच तिला स्वत:लाही आपण स्त्री नसून, पुरुषच असल्याचे जाणवत होते. त्यामुळे तिने अधीक्षकांकडे धाव घेऊन लिंग बदल करुन पुरुष होण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु महासंचालकांनी हा अर्ज फेटाळून लावल्याने तूर्त तरी तिचे पुरुष होण्याची स्वप्न अर्धवटच राहिले.
'त्या' महिला कॉन्स्टेबलला लिंगपरिवर्तनासाठी मुख्यमंत्र्याची परवानगी, सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 5:25 PM