Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींचा फेक व्हिडीओ शेअर, सायबर क्राईममध्ये तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 05:16 PM2019-10-14T17:16:58+5:302019-10-14T19:11:39+5:30
Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई - दिल्लीतील अकाली दलाचे आमदार मंजिंदर एस सिरसा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप सिरसा यांच्याविरुद्ध सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
आमदार सिरसा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन 13 ऑक्टोबर रोजी राहुल गांधींचा एक फेक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडिओ मॉर्फ करुन फेक आणि विकृत उद्देशातून बनविण्यात आल्याचा आरोप साकेत यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी या व्हिडीओचा गैरवापर करण्यात येत आहे. त्यामुळे, हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे साकेत यांनी म्हटले आहे.