मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात, अशोक चव्हाण यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 04:32 PM2019-06-07T16:32:17+5:302019-06-07T16:33:54+5:30
लोकसभा निवडणुकीतील दारुण परभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटीची चिन्हे दिसू लागली असून, विविध राज्यांमध्ये अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. दरम्यान....
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण परभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटीची चिन्हे दिसू लागली असून, विविध राज्यांमध्ये अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत, दरम्यान, महाराष्ट्रातही काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले आहे. मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस आमदारांना आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्यासोबत कोण जाईल असे वाटत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये सध्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. याबाबत अशोक चव्हाण यांनी सांगितले की, ‘पराभवाची समीक्षा करण्यासाठी मित्रपक्षांशी बोलण्याआधी पक्षातील लोकांची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हानिहाय बैठक घेतली आहे. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशा ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत,’
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मित्रपक्षांशी चर्चा करण्यापूर्वी पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहोत. असेही चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेसने घेतलेल्या या बैठकीत स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात सूर लावला. आघाडी झाली तरी राष्ट्रवादीचे लोक खाली मतदारसंघात काँग्रेसला मदत करत नाहीत. उलट राष्ट्रवादीचे लोक भाजपला मदत करतात. त्यामुळे राष्ट्रवाडीबरोबर आघाडी नको, असा सूर बैठकीत उमटला. त्याऐवजी वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी अशीही भूमिका मांडण्यात आली.
यावेळी अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांनी संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर टिप्पणी करणे टाळले. संघाचे सर्वच काही घेण्यासारखे नाही, उदाहरण देण्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. आम्ही संघाचं अनुकरण करणार नाही. पण चिकाटीने काम करून, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.