पुणे : पूर्वी पाणी अडवा पाणी जिरवा अशी घोषणा देण्यात आली होती, परंतु गावागावांमध्ये इतके गटतट तयार करण्यात आले की या घोषणे ऐवजी लोक अडवा आणि एकमेकांची जिरवा असे वातावरण निर्माण झाले. परंतु पानी फाऊंडेशनने जाती धर्माच्या पुढे जात सर्वांना एकत्र करत पाणी अडवण्याचं आणि जिरवण्याचं काम केलं या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमिर खान यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच सध्याच्या सामाजिक परिस्तिथीवर मार्मिक भाष्य देखील केले.
पानी फाऊंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते.
(काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला)
(...जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात दुष्काळ संपला असता - राज ठाकरे)
जलसंधारण हे फक्त सरकारच्या भरोष्यावर होत नाही तर ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, म्हणून सरकारकडून जलयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली. अमिर खान यांनी ही योजना जन आंदोलनात परिवर्तित केली. शिवाजी महाराजांचे सैन्य हे अठरा पगड जातीचं सैन्य होतं. त्यांनी सर्वांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. अमिर खान यांनी सामान्य माणसातील असामान्यत्व जागृत केलं. गावातल्या लहान असलेल्या माणसांनी मोठं काम करून परिवर्तन केलं आहे. पाण्याचा अतिउपसा केला तर पुन्हा दुष्काळ येईल. निसर्गाने आपल्याला खूप दिलं आपणच आपल्याला दुष्काळाकडे नेलं. पिकांच पॅटर्न निश्चित करणं आवश्यक आहे. पूर्वी जलसंधारण म्हणजे नदी नाले केवळ खोल केले जायचे. परंतु पानी फाऊंडेशन ने शास्त्रीय पद्धतीने हे काम केले. वॉटर कप मध्ये आम्ही राजकारण आणणार नाही, पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी आमिर खानला केली.