मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाचा पेच कायम आहे. भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा लाड विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा केला आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपात सेना-भाजपच्या सिटींग जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याचा खुलासा शनिवारी झालेल्या पत्रकार परिषेदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने आमदार पाटणींचा मार्ग मोकळा झाला आहे. तर शिवसेना दावा करत असलेला कारंजा विधानसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा व शिवसेनेत युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले आणि भाजपचे राजेंद्र पाटणी हे ४ हजार १४७ मतांनी विजयी झाले होते. मात्र जुन्या युतीच्या फॉर्म्युलानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आता पुन्हा युती होणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कारंजाची जागा सेनेला सोडण्याची मागणी होती आहे. दुसरीकडे मात्र गत निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून आल्याने व यावेळीही भाजपाकडून या मतदारसंघावर दावा केला जात असल्याने या मतदार संघात मोठा पेच निर्माण झाला होता.
शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितल्याने कारंजाची जागा पुन्हा भाजपकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. तर विद्यामान आमदार पाटणींचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा मतदारसंघात पहायला मिळत आहे. महायुती म्हणून निवडणूक लढताना सुरवातीला इतर मित्र पक्षांच्या जागा निश्चित केल्या जाणार असून, उर्वरित जागांचे फिफ्टी-फिफ्टी वाटप करताना, सिटींग जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी केला आहे. तर एखादी दुसरी जागा अदलाबदल करायची झाल्यास त्यावर चर्चा केली जाणार असल्याचे सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले.
खासदार भावना गवळी यांनी माजी आमदार प्रकाश डहाके यांचा विधानसभेत उमेदवारी देण्याच्या आश्वासन देत शिवसेनेत प्रवेश करून घेतला होता. मात्र आता युतीच्या नवीन फॉर्म्युलानुसार विद्यमान आमदार असलेल्या जागा ज्यांच्या त्यांच्याजवळ राहणार असल्याने कारंजाची जागा भाजपच्या वाट्याला जात आहे. त्यामुळे डहाके हे आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.