पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब गुरुवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत अर्धा डझन मंत्री पंढरपुरात येत आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त समस्त वारकºयांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करतात. मागील वर्षी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. मराठा संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मागील वर्षी मुख्यमंत्री वारीला आले नव्हते. त्यांनी आपल्या घरातच श्री विठ्ठलाची पूजा केली होती. यंदा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब सायंकाळी पंढरपुरात दाखल होत आहेत. पहाटे दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल. यानंतर मराठा संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे, कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष महादेव भंडारी यांचेही दौरे प्रशासनाकडून आले आहेत.
विखे-पाटील भालकेंच्या निवासस्थानी येणारराज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील शासकीय महापूजेसाठी गुरुवारी दाखल होत आहेत. शुक्रवारी पहाटे महापूजा झाल्यानंतर फराळासाठी ते काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी जाणार आहेत. फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री जयदत्त क्षीरसागर बुधवारी भालके यांच्या निवासस्थानी येऊन गेले.