नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वैचारिक परंपरा असून यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंत सर्वांनी ही परंपरा जपली. कमरेखालची टीका झाली तरी या नेत्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले नाही. आताचे मुख्यमंत्री कोणाची औकात काढत आहेत, कुणाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा करत असल्याने त्यांनी वैचारिक परंपरेला हरताळ फासल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी केली.शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका करीत मुख्यमंत्र्यांना गुंडांचे मुख्यमंत्री म्हणत राज्याच्या सर्वोच्च पदाचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पवार यांनी पुढे सांगितले की, सरकार सत्तेचा गैरवापर करीत विरोधी पक्षावर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. आम्ही १५ वर्षे सत्तेत असताना असा सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही. पुण्याच्या आमच्या एका उमेदवाराला बोलावून उमेदवारी मागे घ्या, नाही तर तुमच्या मुलाला ठाण्याहून गडचिरोली दाखवू, असा सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना दम देत आहेत. काही ठराविक अधिकाऱ्यांनाच चांगल्या जागी पोस्टिंग देत आहेत. पुणे-पिंपरी चिंचवड मधल्या खंडणी, खुनाचे गुन्हे, अपहरणाचे आरोप असलेल्यांना ‘वर्षा’वर बोलवून त्यांचे स्वागत केले जात आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही
By admin | Published: February 02, 2017 12:23 AM