खंडाळा (जि. सातारा) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जन्मगाव नायगावपुरते मर्यादित न ठेवता देशभरात त्यांचे विचार व कार्य पोहोचविले पाहिजे. त्यांच्या कार्यप्रेरणेतून देशात महिला सक्षमीकरणाचा पल्ला गाठता आला. यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांत २,८०० नवीन बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सावित्रीबाई फुलेंचे जन्मगाव असलेले नायगाव हे ज्ञानपीठ आणि मांढरदेव हे शक्तिपीठ एकाच रस्त्याने जोडणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली.नायगाव (ता. खंडाळा) येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे, उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, यांच्यासह खासदार, आमदार व्यासपीठावर उपस्थित होते.
शिंदे साहेब, तुम्ही यापुढे प्रत्येक वर्षी येथे या : छगन भुजबळ राज्यातील विविध महापुरुषांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री जात असतात. पण नायगावला काही मोजकेच मुख्यमंत्री आले. शिंदे साहेब, तुम्ही यापुढे प्रत्येक वर्षी येथे या! असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणताच व्यासपीठावर हशा पिकला.