मुंबई : शिवसेनेतील ४० आमदारांसह बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आमदारांची २०० मते देऊ, असे जाहीर केल्याने शिंदे आणखी कोणाला धक्का देणार याची चर्चा सुरू झाली आहे.
मुर्मू यांनी गुरुवारी मुंबईत भाजप-शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुर्मू यांच्या पाठीशी महाराष्ट्र भक्कमपणे उभा असल्याची ग्वाही दिली. शिंदे सरकारने १६४ आमदारांच्या पाठिंब्याने विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर यांनाही तेवढीच मते मिळाली होती. आता मुर्मू यांना २०० मते मिळवून देऊ असे शिंदे यांनी जाहीरपणे सांगितले.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात १५ आमदार आहेत आणि त्यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे, अशी १७९ मते होतात. याचा अर्थ आणखी २१ आमदारांची मते मुर्मू यांच्या पारड्यात टाकण्याची शिंदे-भाजपची रणनीती असल्याचे म्हटले जात आहे. येथे उपस्थित नसलेले अनेक जण मुर्मू यांना मतदान करतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. नितीन गडकरी यांनी मुर्मू यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळतील, असा दावा केला.
द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या महिला आहेत. आदिवासी व्यक्तीला देशाच्या सर्वोच्चपदी बसविण्याचा जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. मुर्मू यांना मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. महाराष्ट्रातून त्यांना रेकॉर्डब्रेक मते मिळतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नंतर माध्यमांना सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ. भारती पवार, भाजपचे सरचिटणीस सी. टी. रवि आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र पाठीशी राहील हा माझा विश्वास : मुर्मू महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला माझा नमस्कार, अशी मुर्मू यांनी मराठीतून सुरुवात केली. महाराष्ट्र माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असा मला विश्वास आहे. पंचायतीपासून लोकप्रतिनिधी म्हणून सुरू झालेल्या प्रवासात मी निडरपणे काम केले. कायद्याची चौकट मोडली नाही. कुणाला घाबरलेदेखील नाही. सामान्य माणसाला न्याय मिळेल अशीच भूमिका घेतली आहे. राष्ट्रपती पदाची संवैधानिक जबाबदारी पार पाडताना माझ्याकडून आपली निराशा कधीही होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
- मुर्मू यांच्या उपस्थितीत पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीचे आमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वा त्यांचे समर्थक आमदार, खासदार यांना देण्यात आले नव्हते.
- ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्यामुळे मुर्मू या मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतील अशी चर्चा होती. तसे काहीही झाले नाही.