भारतमातेचे रक्षण करताना बुलढाण्याचे सुपुत्र अग्निवीर अक्षय गवते यांना वीरमरण आले. मागील वर्षी वादग्रस्त ठरलेल्या अग्नीवीर योजनेद्वारे अनेक तरूण सैन्यात भरती झाले. यातील एका अग्निवीर जवानाला देशाचे रक्षण करताना हौतात्म्य आले. लडाखच्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर (ऑपरेटर) अक्षय लक्ष्मण गवते यांना हौतात्म्य आले. विशेष बाब म्हणजे ऑनड्युटी शहीद झालेले अक्षय पहिले अग्निवीर आहेत. अक्षय यांना वीरमरण आल्यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारतमातेच्या सुपुत्राला सलाम ठोकला. अशातच राज्य सरकारने बुलढाण्यातील सुपुत्राच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
राज्य सरकारने अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवरून याबाबत माहिती दिली. CMO ने एक पोस्ट करत म्हटले, "सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जवान अक्षय गवते हे चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली."