राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे सांगितले आहे.
"ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत", असे शिंदेंनी सांगितले.
तसेच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सद्यस्थितीवरून विरोधकांना फटकारले.
ट्विटच्या माध्यमातून पवारांना धमकीएका अज्ञात व्यक्तीने ट्विटच्या माध्यमातून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरून पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले आहे. या दोन ट्विटर हँडलवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच या व्यक्तींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.