मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवलेला दिसून येत आहे. आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली.
मनोहर जोशी यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोहर जोशी हे शिवसेनेचे प्रमुख नेते होते. त्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच कामाला येईल. आज जोशी यांनी मला ६० योजनांचे एक पुस्तक दिले. या योजनांची युती सरकारच्या काळात घोषणा केली होती. त्यांनी या योजना राबविण्याचा सल्ला दिला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
याचबरोबर, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित योजनांची माहिती मनोहर जोशी यांनी दिली. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही. त्यामुळे कोणताही राजकीय अर्थ काढू नका. आम्ही शेतकरी, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांना आपल्या गटात सामील करण्यासाठी एकनाथ शिंदेनी खास रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार एकनाथ शिंदेंनी गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी शस्त्रक्रिया झालेले खासदार गजानन किर्तीकरांची भेट घेतली होती.
बुधवारी रामदास कदम यांच्या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होता. तर गुरुवारी सकाळी ज्येष्ठ शिवसेना नेते लीलाधर डाके यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांण उधाण आले आहे.