मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. तसंच अनेक जण राज्यात सत्तांतर होऊ शकतं अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहे. त्यांच्या भेटीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
दरम्यान, एकनाथ शिंगे आणि राज्यपाल रमेश बैस यांच्यात एक तास बैठक होण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. या बैठकीचा टायमिंग मात्र महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जातंय. पुढील काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलंय. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यास एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ४० आमदारांसह भाजपला पाठींबा देतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु यावर पूर्णविराम देत अजित पवार यांनी जीवात जीव असेस्तोवर आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करणार असल्याचं स्पष्ट केलंय.