आज रविवारी ऐतिहासिक अशा शिवाजी पार्क मैदानात इंडिया आघाडीची सभा होत आहे. काँग्रेसची गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा काल मुंबईत पोहोचली आहे. आज दादरमधील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत 'इंडिया' आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी उपस्थित आहेत. काल त्यांनी चैत्य भूमीला भेट दिली. या सभेला माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
सभेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत आहेत. भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टीका केली. ते म्हणाले की, आजचा दिवस शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. कारण जे शिवतीर्थ... ज्या शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केलं. याचं ऐतिहासिक मैदानात ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर आरोप केले. त्यांच्यासोबत सभा घेण्याची वेळ आली आहे हे दुर्दैवच आहे. आज 'गर्व से कहो हम हिंदू है' हे कसं बोलणार... हा देखील प्रश्न आहे.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बोलायला पण काही लोक घाबरत आहेत. त्यामुळं मला वाटतं की, बाळासाहेबांची विचारधारा सोडणाऱ्यांना जनता चांगलाच धडा शिकवेल. आज आमदार आमश्या पाडवी आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचारधारेच्या शिवसेनेत आले आहेत. इथं बाळासाहेबांचं विचार आणि तिकडं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारी लोकं आहेत.
दरम्यान, ६३ दिवस सुरू असलेल्या या यात्रेची आज सांगता होणार आहे. आज रविवार १७ मार्च रोजी सभेचे आयोजन करण्यात आले असून यात इंडिया आघाडीचे सर्व दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.