मुख्यमंत्र्यांनीच समेट घडवावा!
कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे केंद्र आणि राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यातील धुसफूस सुरूच आहे. मध्यंतरी शिवसेनेच्या पूर्वेतील स्थानिक पदाधिकाऱ्याने केलेल्या टीकाटिप्पणीवरून उद्भवलेल्या वादात आ. गायकवाड आणि भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते. त्यांची समजूत काढण्यासाठी दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरगुती कार्यक्रमाचे कारण देत कल्याण पूर्वेत पायधूळ झाडावी लागली होती. पण फडणवीसांच्या भेटीनंतरही खासदार, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि आमदारांमध्ये टोले-प्रतिटोले लगावण्याचा सिलसिला सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आता पुढाकार घेत खासदार आणि आमदारांमध्ये समेट घडवावा, अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
पप्पू कलानींची दुहेरी भूमिका?
उल्हासनगरातील पप्पू कलानी यांच्यामुळे शरद पवार एकेकाळी राजकीय आरोपांच्या वावटळीत सापडले होते. पप्पू कलानी हे आजही आपण शरद पवार समर्थक असल्याचे सांगतात. मात्र, कलानी यांचे पुत्र ओमी व त्यांच्या पत्नी पंचम यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शहरातील विकासकामांकरिता निधीची मागणी केली. या भेटीमध्ये मध्यस्थाची भूमिका माजी खासदार आनंद परांजपे यांनी बजावली होती. कलानी कुटुंबाने शरद पवारांची साथ सोडल्याची कुजबुज सुरू होताच पप्पू कलानी यांनी आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचा खुलासा केला. गेल्या आठवड्यात पुन्हा ओमी यांनी अजित पवार यांची भेट घेतली. थोडक्यात शरद पवार हवे की विकास निधी हवा, असा पेच कलानी कुटुंबासमोर आहे.
शाखाप्रमुखांना का भेटत आहेत...
कालिना विधानसभेचे ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस यांच्या कालिना येथील कार्यालयाबाहेर गेल्या काही दिवसांपासून माजी शाखाप्रमुखांच्या रांगा लागल्या आहेत. मुळात फार सक्रिय नसणारे पोतनीस गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यात बहुतांशी कार्यकर्त्यांना भेटतानाच, ज्याच्या हाती शाखा आहे; त्या प्रमुखांना भेटण्याऐवजी त्यांनी माजी शाखा प्रमुखांना भेटण्यावर भर दिला आहे. मुळात ही भेट म्हणजे नित्याची प्रक्रिया असली तरीदेखील माजी शाखाप्रमुखांचा चेहरा पाहून तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमके काय फेरबदल होतील, त्यासाठीच तर या भेटीगाठी वाढलेल्या नाहीत ना ? या चर्चेने जोर पकडला आहे.