छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही दोघेही मंत्री होतो; परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे योजनेचा प्रस्ताव घेऊन गेल्यावर ते निर्णयच घेत नव्हते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्षाला एकच सांगायचे की, त्यांनी अडीच वर्षांत घोषणाही केल्या नाहीत. प्रकल्पांसाठी निधी मिळणारच आहे. जे कधी मंत्रालयात गेले नाहीत, ते काय घोषणा करणार. ठाकरे सरकारमध्ये आम्ही दोघेही होतो; परंतु आम्ही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही योजना घेऊन जायचो, त्यावर निर्णयच होत नव्हता. त्याचा अनुभव अजित पवारांनाही आहे. इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे. आम्ही सरकार पलटवले नसते तर राज्य आणखी मागे गेले असते, आता राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. जेव्हा जायचे होते, शेतकऱ्यांच्या बांधावर तेव्हा गेले नाहीत. तेव्हा तर घराजवळदेखील कुणाला येऊ देत नव्हते. तेव्हा नीट राहिले असते तर हे दिवसदेखील आले नसते, अशी टीकाही शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचे मत असे...मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसविले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, पटोले यांना राज्यात कुणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे, आंदोलनामागे शिंदेंचा हात आहे का म्हणून, जरांगे यांनी माझ्या आवाहनाला मान दिला. मराठा आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. गृहमंत्र्यांवर केलेले आरोप खोटे असून, त्यांनी पोलिस लाठीमारप्रकरणी माफी मागितली आहे. कुणबी नोंद असेल तर मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसींना आक्षेप नाही. सरसकट आरक्षण देण्यास ओबीसींचा विराेध आहे. त्यामुळे अशी कोणतीही भूमिका, राज्याची नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही. जे सध्या आरोप करीत आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.