सातारा - "परदेशी कशाला जायाचं, गड्या आपला गाव बरा, शेत पिकाची दुनिया न्यारी, वसे जिथे विठूरायाची पंढरी..." लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे परदेशात गेलेल्या उद्धव ठाकरे, संजय राऊतांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ दरे गावी आहेत. तिथून त्यांनी ट्विट करून माहिती दिली की, शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत मुख्यमंत्री शेताची, फळांची, झाडांची पाहणी करतायेत हे दिसतं. तसेच आपली शेती कधी विकता कामा नये, त्यातून आपल्याला उत्पन्न मिळतं. तुमच्याकडे जमीन असेल तर उत्पादन घ्या. त्यामुळे जमीन विकू नका. त्यातून पुढे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल असा संदेश व्हिडिओतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना दिला.
लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि राज्यातील अखेरचा टप्पा संपल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता आहे. गेल्या २ महिन्यापासून राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. आता प्रचार संपल्यानंतर अनेक राजकीय नेते विश्रांतीच्या मूडमध्ये आहेत. काही नेते परदेशात गेले आहेत. त्यात उद्धव ठाकरे कुटुंबीय, संजय राऊत हे परदेशात आहेत. तर शरद पवार हेदेखील काश्मीरला गेले आहेत. महाराष्ट्रात ५ टप्प्यात निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. राज्यातील ४८ पैकी आम्ही ३५ ते ४० जागा जिंकू असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर महायुतीही आम्हीच विजयी होणार असं म्हणतेय. मात्र निकालापूर्वी राजकीय नेते व्हेकेशन मूडमध्ये गेल्याचं दिसून येते.