- संजय घावरे मुंबई - ध्येयवेडेच इतिहास घडवतात. साडे तीन महिन्यांपूर्वी आम्हीही एक दौड लावली होती. ती दौड महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी होती असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उन्नतजवळ मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये नवीन फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याचे घोषित केले. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाच्या घोषणेप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाची घोषणा करण्यात आली. याशिवाय उदय सामंत आणि प्रताप सरनाईकही या सोहळ्याला उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी नारळ वाढवला, तर ठाकरे यांनी क्लप दिला. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारला उद्देशून राज ठाकरे म्हणाले की, वेडात मराठे वीर दौडले चाळीस! 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाची कथा महेशने पाच वर्षांपूर्वी ऐकवली होती. तेव्हाच त्याचे भव्य चित्र डोळ्यासमोर उभे राहिले होते. आज मराठी सिनेमा कात टाकतोय आणि पुढे जातोय. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण आहे? असा प्रश्न राज यांनी मांजरेकर यांना विचारल्यावर अक्षय कुमार समोर आला. आपण शिवाजी महाराज साकारत असल्याचे अक्षयने सांगितले. अक्षय म्हणाला की राज ठाकरे यांच्यामुळे मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मिळाली आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. प्रथमच मराठी सिनेमात काम करत असून महेश मांजरेकर यांच्या सोबतही काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जबाबदारी खूप मोठी असल्याचेही अक्षय म्हणाला. सात वर्षांपूर्वी 7 या नावाने घोषित केलेल्या या सिनेमाला अखेर आज खऱ्या अर्थाने सुरुवात होत असल्याचे महेश मांजरेकर म्हणाले.
'वेडात मराठे वीर दौडले सात' हा सिनेमा मराठीसह हिंदी आणि तेलुगू मध्येही बनणार आहे. या सिनेमात प्रवीण तरडे, सत्या मांजरेकर, जय दुधाणें, हार्दिक जोशी, विराट मडके, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम मुख्य भूमिकेत आहेत. पुढील महिन्यात याचे शूट सुरू होणार असून, पुढल्या दिवाळीला रिलीज होणार आहे.