मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्व जण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले.
मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. दीपांकर दत्ता, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. तातेड, मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आमचे पहिले प्राधान्य सर्वसामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे घटक आहेत. अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सध्या ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येते, ती वाढवून ३ हेक्टर मर्यादेत करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे.
ओबीसी, मराठा, धनगर समाज यांना आरक्षणाचे फायदे मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतिमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत हे प्रशासनाला सांगितले आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी नावीन्यपूर्ण आणि चांगले उपक्रम राबविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री तसेच केंद्रातील इतर मंत्रिमहोदय यांनी राज्याच्या विकासाला काही कमी पडू दिले जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. ‘आमचे गुरुजी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात वर्गामध्ये शिक्षकांचे छायाचित्र लावण्यात येईल.
वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण झाले. याप्रसंगी उपस्थित पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, पर्यटन व कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.