मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कऱ्हाड दौरा रद्द, प्रकृती ठिक नसल्याची शंभूराज देसाईंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:25 PM2023-11-25T12:25:56+5:302023-11-25T12:28:16+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येणार होते. मात्र एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे.
कऱ्हाड : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Death Anniversary) यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यातील कऱ्हाडमध्ये असलेल्या त्यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी अनेक नेतेमंडळी पोहचले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येणार होते. मात्र एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येऊ शकले नाहीत, अशी माहिती राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज कऱ्हाडमध्ये येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी येणार होते. त्यांचा शासकीय दौरा देखील निश्चित झाला होता. त्यानुसार स्थानिक प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. पण, मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचा दौरा रद्द झाला आहे.
दरम्यान, सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील आयोजित भजनकार्यक्रमास उपस्थिती लावली.