मुंबई : भाषणात दिलेल्या उदाहरणामुळे अनावधानाने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलगिरी व्यक्त केली आहे. आघाडी सरकारच्या कामाचे स्वरूप सांगताना अगदी अनावधानाने एक उदाहरण दिले. तसे उदाहरण देण्यामागे समाजाच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष सुधीर उर्फ बंडू राऊत यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.पुणे जिल्ह्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या विकासकामांच्या पद्धतीवर टीका केली होती. आघाडीच्या कार्यकाळात कोणताच प्रकल्प पूर्ण केला जात नव्हता. प्रत्येक प्रकल्प सुरू करायचा आणि अर्धवट सोडायचा अशीच रीत होती. आघाडी सरकारची ही पद्धत सांगताना अगदी सहजपणे एक उदाहरण अनावधानाने दिले. त्यामागे कोणत्याही जात-समूहाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.साखर कारखान्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर नाभिक समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. समाज माध्यमांतूनही मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचे मेसेज फिरत होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नाभिक महामंडळाच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवत दिलगिरी व्यक्त केली.
‘त्या’ विधानाबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी,नाभिक महामंडळाच्या उपाध्यक्षांना पत्र ;भावना दुखावण्याचा हेतू नव्हता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:55 AM