मुंबई : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्रामध्ये बाजू मांडण्याकरता आपण स्वत: दिल्लीला जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने करा, अशी मागणी जानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.धनगर समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (टिस) अहवाल दिलेला आहे. त्या आधारे अनुसूचित जमातींच्या सध्याच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता धनगर समाजाला अनुसूचित जमातींचे आरक्षण देण्याची आपली भूमिका आहे, असे मुख्यमंत्र्यांनी चर्चेत स्पष्ट केले. केंद्रापुढे या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी स्वत: दिल्लीला जाण्याची आपली तयारी असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. जानकर यांच्यासोबत आ. राहुल कुल, रत्नाकर गुट्टे, एस. एन.अक्कीसागर, श्रद्धा भातंब्रेकर, भारती पाटील आदी होते.
धनगर आरक्षासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 4:31 AM