मुंबई, दि. 11- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत तुमची योग्यता आणि उपयोगिता सिद्ध करा, जनहिताचे काय निर्णय घेतलेत ते सांगा, अशी तंबीच त्यांनी मंत्र्यांना दिल्याचं समजतं आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रत्येक मंत्र्याचा 'केआरए' पाहून, कामगिरीची शहानिशा करूनच मुख्यमंत्री बढती-बदली-पदावनतीबाबत निर्णय घेणार असल्याचं समजतं आहे. त्याची सुरूवात म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना एक प्रश्नावली पाठवली आहे. व त्यावर उत्तरं मागविली आहेत. मंत्र्यांनी पाठविलेली उत्तरं तपासून नवरात्रीनंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करू शकतात, असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबरला देवेंद्र सरकारला तीन वर्षं पूर्ण होत आहेत. त्यावेळी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठीही या कार्य अहवालाचा उपयोग होऊ शकतो.
तीन वर्षांच्या कालावधीत मंत्री म्हणून काय विशेष काम केलं? गेल्या सरकारच्या तुलनेत तुम्ही केलेलं काम श्रेष्ठ कसं ठरतं? तुमच्या कामामुळे जनतेच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला? ही संपूर्ण माहिती तुलनात्मक आकडेवारीसोबत द्या. अपूर्ण आणि चुकीची माहिती स्वीकार केली जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर येणारी माहिती स्वीकारली जाणार नाही आणि तुम्ही काहीही काम केलेलं नाही, असं मानण्यात येईल, असे काहीसे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना विचारले असल्याचं समजतं आहे.