ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.4 - पोलिसांशी ऋणानुबंध असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर गृहखाते मिळेल असे वाटले होते, मात्र ते मिळाले नाही, त्यानंतर ग्रामविकास खाते मिळेल असे वाटले मात्र तेही मिळाले नाही. अखेर ज्या खात्याच्या विरोधात आंदोलन करीत होतो, जेथे प्रचंड अडचणी आहेत, नेमके तेच खाते देण्यात मुख्यमंत्र्यांचाच वेगळाचा डाव असावा, असा गौप्यस्फोट सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात केला.
जळगावातील जळगाव जनता सहकारी बँकेच्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रविवारी गुलाबराव पाटील यांचा सत्कार झाला.
मंत्रीपद मिळाल्यानंतर गुलाबराव पाटील यांना कोणत्या खात्याची अपेक्षा होती, या विषयी रविवारी त्यांनी जळगावात मनमोकळेपणाने जाहीर कार्यक्रमात सांगितले. पोलिसांशी आपले ऋणानुबंध असल्याने गृहखाते, ते नाही तर जनतेच्या सेवेची आवड असल्याने ग्रामविकास खाते मिळेल असे वाटले होते, मात्र झाले वेगळेच ज्या खात्याची अडचण आहे, तेच खाते मिळाले असा उल्लेख त्यांनी केला. या खात्याविरोधात आंदोलन करीत राहिल्याने हे खाते देण्यात मुख्यमंत्र्यांचाच डाव असावा असे सांगत ‘जहा चोरो का जर था, वही रात हो गयी’ अशा ओळीही जोडल्या. मंत्रीपदाला डाग लागणार नाही याची काळजी घेणार आंदोलन हा स्वभावच आहे, मात्र भविष्यात जळगाव जनता बँकेच्या कार्याचा आदर्श घेत काम करीत राहू व मंत्रीपदाला डाग लागणार नाही, याची काळजी घेऊ असेही गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.