सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारू नयेत. अनेक जणांच्या भ्रष्ट कारभाराचा सातबारा माझ्याकडे आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठ उद्योगपतींना १६00 कोटींच्या दिलेल्या वीजसवलतीचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे एका जाहीरसभेत बोलताना सोमवारी केला. पाऊण तासाच्या भाषणात राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. अच्छे दिन आयेंगे, मेहंगाई कम होगी, काला धन वापस आयेगा, अशा थापा मारून मोदी सत्तेवर आले. तीन वर्षांत किती महागाई कमी झाली व किती जणांच्या खात्यावर मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पैसे जमा केले. उलट या काळात भाजपाच्याच लोकांकडे काळा पैसा सापडला, पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही. इकडे राज्यात मुख्यमंत्री फडणवीस वारंवार खोटे बोलत आहेत. यांचे मंत्री कुठे, कधी पैसे घेतात, हे मी वेळ आल्यावर आकड्यासह सांगेन. २0१४ च्या निवडणुकीवेळेस फडणवीस यांनी विदर्भातील आठ उद्योजकांना आम्ही सत्तेवर येऊ, तेव्हा तुम्हाला मदत करू, म्हणून त्यांच्याकडून मदत घेतली. सत्तेवर आल्यावर लगेच युनिटला दोन रुपये प्रमाणे या उद्योगपतींना १६00 कोटीची सवलत दिली, असा आरोप राणे यांनी केला. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांनी दिली आठ बड्या उद्योगपतींना १६०० कोटींची सूट
By admin | Published: February 14, 2017 12:57 AM