ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या पुण्यातील सभेकडे मतदारांनी पाठ फिरविल्याने त्यांना सभा रद्द करावी लागली. वारंवार खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे यावरून स्पष्ट झाले असून हे भाजपविरूद्धच्या बदलत्या हवेचे द्योतक असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
पुण्यातील टिळकरोड परिसरात दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी मुख्यमंत्री सभेसाठी दाखल झाले. परंतु १५ मिनिटे थांबून देखील मतदार सभेसाठी आलेच नाही. त्यामुळे त्यांना ही सभा रद्द करून पुढील सभेसाठी जावे लागले. चुकीची वेळ आणि विसंवाद, यामुळे सभा रद्द करण्यात आल्याचे तकलादू कारण मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी देशातून आणि राज्यातून भाजपची हवा संपल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. असे चव्हाण म्हणाले. खरतर रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांना टाळता आली असती. परंतु, भाजपची जनेतेशी नाळ तुटल्याने तसेच वारंवार खोटं बोलल्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे हे हाल झाल्याची टीका चव्हाण यांनी केली.
दरम्यान, नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील सभेतही असेच झाले. आज साडेचारच्या सुमारास या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची सभा होणार होती. परंतु सहा वाजेपर्यंत या सभेला गर्दी जमा झाली नाही. केवळ रिकाम्या खुच्यांची गर्दी मैदानावर दिसत होती. या दोन्ही घटनांवरून मोदींची हवा संपली असून भाजपवर आणि मुख्यमंत्र्यांवर लोकांचा विश्वास राहिला नाही हे स्पष्ट झाला आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित झाला आहे असे खा. चव्हाण म्हणाले.