एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:51 IST2025-04-14T16:47:28+5:302025-04-14T16:51:31+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यात घुसखोरी होत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.

Chief Minister infiltration of Ajit Pawar Ministry NCP SP Rohit Pawar claims | एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा

एकनाथ शिंदेंनंतर आता अजितदादांचा नंबर... मुख्यमंत्र्यांनी अर्थखात्यात घुसखोरी केल्याचा रोहित पवारांचा दावा

Rohit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेपासून महायुतीच्या सरकारमध्ये काही आलबेल नसल्याची चर्चा सातत्याने पाहायला मिळत आहे. पालकमंत्री पदाच्या वादापासून ते निधी वाटपापर्यंत तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे पाहायला मिळत आहे. वरिष्ठ नेत्यांकडून मात्र सर्व काही ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यात घुसखोरी होत असल्याचे म्हटलं. ही घुसखोरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षातील निर्णयांचा आढावा घेत एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली, आता अजित पवारांचा नंबर असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे पद निर्माण केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय रोहित पवारांनी?

"मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केलेली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील. गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली आता अजितदादांचा नंबर आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला असून मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्तीचा भाग आहे. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील," असे रोहित पवावर म्हणाले.

"राहिला प्रश्न मित्रपक्षांचा, तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ ‘तात्पुरती सोय' एवढाच अर्थ आहे, त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल," असं रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 

Web Title: Chief Minister infiltration of Ajit Pawar Ministry NCP SP Rohit Pawar claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.