जामनेर (जि. जळगाव) : अडीच वर्षांत देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. त्यात राज्यात ९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनदेखील शासनाला त्याचे गांभीर्य नाही, असंवेदनशील मुख्यमंत्री प्रतिसाद न देता म्हणतात की, वेळ आल्यावर निर्णय घेऊ. त्यांना नेमकी कोणती वेळ अपेक्षित आहे, समजत नाही. सैराट सरकारचा झिंगाट कारभार थांबविण्यासाठी जनतेनेच त्यांना हाकलून लावावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे सभेत केले.हे शासनच बीओटी तत्त्वावर चालविले जात असल्याचे ते म्हणाले. आमच्या शासनाने जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजना व इंदिरा आवास योजनांची नावे या शासनकर्त्यांनी बदलविली आहेत. त्यामुळे हे शासन गेम चेंजर नव्हे तर नेम चेंजर आहे, असे त्यांनी सांगितले.सरकारमधील लोक केवळ घोषणा देतात. तारीख काही जाहीर करीत नाही, यांचे सत्तेतील भागीदार देखील असेच आहेत. शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे खिशातच आहेत. बाहेर काढण्याची तारीख ते का जाहीर करीत नाहीत. राज्याचे कायदे खासगी माणसे तयार करीत असून हे शासनच बीओटी तत्त्वावर चालविले जात आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
शेतकरी आत्महत्येबाबत मुख्यमंत्री असंवेदनशील
By admin | Published: February 12, 2017 1:43 AM