ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ : राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थिंसोबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान वेब बेस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या उपक्रमात राज्यातील ५६ शासकिय आयटीआयची निवड केली असून खासगी आयटीआयला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या खासगी आयटीआय प्राचार्य, कर्मचारी संघटनेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ४१७ शासकीय आणि ४५४ खासगी आयटीआय आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रवेश प्रक्रियेत ८६ हजार २६४ प्रशिक्षणार्थिंनी शासकीय आणि ३० हजार ७८४ प्रशिक्षणार्थिंनी खासगी आयटीआयमध्ये प्रवेश घेतले. याठिकाणी प्रशिक्षणार्थिंना विविध ७८ प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ह्यस्कील इंडियाह्ण या योजनेबाबत संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळायला हवी. मात्र प्रशासनाने दुजाभाव करत खासगी आयटीआयला पुन्हा एकदा सावत्र वागणूक दिल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी केला आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिगसाठी आवश्यक सुविधा असल्यानेच पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय आयटीआयची निवड केल्याचा खुलासा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केला आहे. सदर उपक्रम वर्षभर चालणार असून भविष्यात खासगीआयटीआय निवडीचा विचार नक्कीच केला जाईल, असेही संचालनालयाने स्पष्ट केले. तूर्तास तरी शासनाच्या विभागस्तरावर हा निर्णय झाला असल्याने कोणीही रागवण्याचे कारण नाही, असे आवाहन संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेकेले आहे.