- विशेष प्रतिनिधीमुंबई - राज्यातील पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम व प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका व कॅनडाच्या दौ-यावर शनिवारी सकाळी रवाना झाले आहेत.या दौ-यात अॅमेझॉन या नामांकित समुहातर्फे मुख्यमंत्र्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात वरिष्ठ अधिकाºयांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ कॅनडातील मॉन्ट्रीयल तसेच अमेरिकेतील न्यू यॉर्क, वॉशिंग्टन आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांना भेटी देऊन विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांशी चर्चा करणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत संबंधित क्षेत्रातील संस्था-उद्योग समुहांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. कॅनडातील मॉन्ट्रीयल शहराच्या भेटीदरम्यान आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि त्या अनुषंगाने कृषी तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांबाबत तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडो यांच्या निमंत्रणावरुन ही भेट होत आहे. अमेरिकेतील आघाडीच्या उद्योग समुहांकडून राज्यात करावयाच्या गुंतवणुकीबाबतही मुख्यमंत्री संबंधितांशी चर्चा करणार आहेत. यामध्ये जागतिक बँक, गुगल, अॅपल, इंटेल, फोर्ड, ओरॅकल, सिमॅन्टेक, सिस्को इत्यादींचा समावेश आहे. राज्यातील महत्त्वाच्या उपक्रमांबाबत काही समुहांशी परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करारही होणार आहेत.मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री अमेरिका, कॅनडा दौऱ्यावर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 5:08 AM