मुंबई, दि. 21 - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजकीय कारकीर्दीतील नारायण राणे यांचे हे दुसरे बंड आहे. वयाच्या 16 व्या वर्षापासून शिवसेनेमधून नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. स्थानिक शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास करणा-या नारायण राणेंची महत्वकांक्षी आणि आक्रमक नेते अशी ओळख आहे.
1968 साली शिवसेनेने त्यांच्याकडे चेंबूरच्या शाखाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांनी झोकून देऊन काम केले आणि चेंबूर विभागात शिवसेना वाढवली. शिवसेनेचा तो संघर्षाचा काळ होता. पक्ष विस्तार करताना वाद, हाणामा-या व्हायच्या. त्यावेळी राणेंनी अनेकांना अंगावर घेतले आणि चेंबूरमध्ये शिवसेना रुजवली. 1985 साली त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले. चेंबूरच्या कोपरगावमधून ते महापालिकेवर निवडून गेले. या दरम्यान त्यांनी बेस्ट समितीचे अध्यक्षपदही भूषवले.1990 साली त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले.
विधानसभेची निवडणूकही राणेंनी जिंकली. 1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर शिवसेनेत नारायण राणे यांचे महत्व वाढू लागले. 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे दुग्धविकास नंतर महसूलमंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मंत्री म्हणून नारायण राणे यांची काम करण्याची पद्धत, झटपट निर्णय घेण्याची क्षमता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आवडली शिवाय राणे त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील असल्याने अखेर राज्यात सत्ताबदल झाला तेव्हा मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून त्याजागी राणेंची नियुक्ती करण्यात आली.
पण राणे यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा काही महिन्यांचा होता. कारण त्यानंतर निवडणूका लागल्या आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी राणेंकडे शिवसेनाप्रमुखांनी राज्याच्या विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी सोपवली. राणेंनीही आपल्या पदाला न्यायद्यायचा पूर्ण प्रयत्न केले. विरोधीपक्षनेते म्हणून राणेंनी केलेल्या कामाचे आजही कौतुक केले जाते. पण त्याचवेळी शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जुळवून घेणे त्यांना जमले नाही.
2004 च्या विधानसभा निवडणुकतही शिवसेना-भाजपा युतीचा पराभव झाला. या दोन्ही पक्षांना विरोधात बसावे लागले. पण त्याचवेळी राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुप्त संघर्ष सुरु होता. अखेर राणेंनी त्यांच्या आक्रमक स्वभावाप्रमाणे उद्धव यांच्यावर तोफ डागली आणि राणे यांची 3 जुलै 2005 रोजी शिवसेनेतून हाकलपट्टी करण्यात आली. नारायण राणे गेल्याने काही फार फरक पडणार नाही असे शिवसेनेला वाटले होते. पण राणेंनी आपल्या स्वभावाप्रमाणे शिवसेनेला चांगेलच जेरीस आणले.
आजचे नारायण राणेंचे बंड आणि 2005 सालचे बंड यामध्ये फारच फरक आहे. शिवसेना सोडली त्यावेळी नारायण राणेंसोबत 10 पेक्षा जास्त आमदार, हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेतून फुटून बाहेर पडले. नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करायला लावणार अशी गर्जना केली. त्याप्रमाणे शिस्तबद्ध प्रचार, व्युहरचना करुन त्यांनी कणकवलीतून मोठा विजय मिळवला.
शिवसेना उमेदवार परशुराम उपकरांचे डिपॉझिट जप्त झाले. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना महत्वाचे महसूल खाते देण्यात आले. पण राणेंना मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा असल्याने त्यांनी विलासराव देशमुखांनाच आवाहन देण्यास सुरुवात केली. देशमुख त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राणेंना त्यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांची साथ होती. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राज्यात नेतृत्वबदल करण्यात आला. देशमुखांच्या जागी अशोक चव्हाणांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. राणेंनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण त्यात यशस्वी झाले नाहीत. अखेर त्यांनी अहमद पटेल आणि राहुल गांधी यांच्यावर बेछूट आरोप केले. त्यामुळे त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. पण नंतर निलंबन मागे घेऊन त्यांना सरकारमध्ये सामावून घेतले.
2009 विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर त्यांच्याकडे उद्योगमंत्रीपदाचीजबाबदारी दिली. 2014 लोकसभा निवणुडीक पुत्र निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर त्यांचा रोख होता.
2014 मध्ये काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील निवडणूक लढवावी अशी त्यांची मागणी होती. पण त्यांच्याकडे प्रचारसमितीचे प्रमुखपद देण्यात आले. 2014 मध्ये कुडाळ या त्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर राणे सातत्याने स्वपक्षीयांवरच टीका करत होते. अखेर काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेवर पाठवले. पण तरीही त्यांची नाराजी, अस्वस्थतता दूर झाली नाही. भाजपाबरोबर त्यांची जवळीक वाढल्यानंतर सिंधुदुर्गात नवीन कार्यकारीणी घोषित करण्यात आली. अखेर या सर्व नाराजीतून आज घटस्थापनेच्या दिवशी राणेंनी काँग्रेसच्या आमदारकीसह पदाचा राजीनामा दिला.