मुंबई : अतिशय सामान्य घरात जन्म घेऊनही स्वकर्तृत्वावर शिक्षणाचा वटवृक्ष उभारणाऱ्या पतंगराव कदम यांच्यासारख्या महान नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलेय याचे महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला दु:ख आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांना आदरांजली वाहिली.मुंबईत बुधवारी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. चर्चगेटजवळील जयहिंद कॉलेजच्या सभागृहात बुधवारी झालेल्या शोकसभेला सर्वपक्षीय दिग्गज नेते उपस्थित होते. पतंगरावांच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्री म्हणून त्यांची कामगिरी थक्क करणारी होती. एखादी गोष्ट त्यांच्या मनाला पटली की ते त्याची पूर्तता करेपर्यंत स्वस्थ बसत नसत. त्यांनी मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आणि प्रत्येक खात्याला यथोचित न्याय दिला.काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पतंगरावांच्या भारती विद्यापीठाच्या भरभराटीविषयी आणि तिथे मिळणाºया शिक्षणाविषयीच्या आठवणी जागवल्या. एका छोट्याशा खोलीत पुण्यात त्यांनी भारती विद्यापीठ सुरू केले आणि हळूहळू ते महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाचे शिक्षण व्यासपीठ बनवले, असे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. तर, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील यांच्यानंतर आपण सर्वच क्षेत्रांत भरीव काम करणाºया एका मोठ्या नेत्याला मुकलो, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. अनेकवेळा त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली; पण त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल असलेली निष्ठा कधीही सोडली नाही. विधानसभेत एकही कागद हातात न घेता प्रत्येक खात्याविषयी, त्यातील नियमाविषयी तासन्तास बोलू शकणारे पतंगरावांसारखे नेते विरळच असतात. अधिकाºयांना, नेत्यांना एकेरी शब्दांत हाक मारणारा, मिश्कील स्वभावाचा नेता सभागृहात आता दिसणार नाही, अशी खंतही पवार यांनी बोलून दाखविली.अनेकांची उपस्थितीशोकसभेला पतंगराव कदम यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते विश्वनाथ कदम, संपूर्ण कदम परिवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते आदी अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.
उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले - मुख्यमंत्री : सर्वपक्षीय शोकसभेत पतंगराव कदम यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:54 AM